सकाळी लवकर उठुन सगळ्यांनी आटपून घेतलेलं. प्रवास होत असला तरी रात्री चांगली झोप व व्यवस्थित जेवण असल्यामुळे प्रवासाचा शिणवटा जाणवत नव्हता . विशेष म्हणजे राजेशला बरं वाटत असल्यामुळे सगळ्यांनाच उत्साह वाटत होता . झंस्कार करून परत कारगीललाच यायचं असल्यामुळे आम्ही काही सामान मागे ठेवुन ,लागणारे सामान गाडीत चढवले व प्रवासाला सुरुवात केली.
सुरु नदी खळाळून वाहत होती .उत्तरेकडच्या नद्या असाच खळाळून वाहतात पण सुरु नदीचा वेगवान गढूळ प्रवाह बघितला कि वेगळच फीलिंग येतं . शहराच्या मधून हि नदी वेगवान प्रवाहाने आपली साथ देत राहते पुढील रस्त्यावर. थोड्या वेळाने रस्ता सुरु झाला.
 |
| ओला डांबरी रास्ता व डावीकडे नदी (PC -राजेश ) |
पावसाच्या हलक्या सरींमुळे ओला झालेला डांबरी रास्ता व दुतर्फा हिरवीगार झाडे ,मध्येच दगडी घरे ,आजूबाजूला सुंदर पक्षी ,आल्हाददायक वातावरण सुरु व झंस्कार व्हॅली प्रवासात ऍड केल्याबद्दल व त्यासाठी आग्रही राहिल्याबद्दल मीच स्वतःची पाठ थोपटून घेतली. ते सगळं निसर्गसौंदर्य बघुन आम्ही सगळेच खुप खुश झालो होतो. सारखे गाडीतून उतरून फोटो काढणे चालले होते. यादरम्यान बर्याचश्या ब्लॅक बिल्ड मॅगपाय (BLACK BILLED MAGPIE) चं दर्शन झालं .
वैभव ने त्याला पंधरा कावळा असं नाव दिलेलं ☺ती मॅगपाय रॉबिनचीच जातकुळी आहे हे तेव्हा मला माहित नव्हतं .हळुहळू धुक्यात हरवलेले बर्फाचे डोंगर दिसायला सुरुवात झाली .
 |
| PC -राजेश |
 |
| फुल्ल ऑन बजेट पिकनिक नाश्ता -ऑम्लेट ब्रेड बिस्कीट टी:)@संकु |
संकु (SANKOO ) येऊन गेल्यावर ड्राइवर अचानक कारत्से गावात शिरला . येथे जुनी बुद्धमूर्ती आहे असे म्हणाला .आम्हाला काहीच माहिती नव्हते याबद्दल. म्हणजे बराच वाचन केल्यावर पण मला इकडे येण्यापूर्वी ह्याचा संदर्भ मिळल नव्हता .गावात गाडी थांबल्यावर तिथून एका ओढ्यावरून पुढे जाऊन त्याने आम्हाला दगडांत कोरलेली बुद्धमूर्ती दाखवली.
६ मीटर उंच (लडाखमधील सगळ्यात उंच) दगडांत कोरलेली हि मैत्रेय बुद्धाची मूर्ती ७ व्या शतकातील आहे व तिचा शोध २००९ साली लागलाय . मुस्लिम राजवटीच्या आधी तिथे बुद्दिस्ट लोकांचा अधिवास होता हे ती मूर्ती सापडल्यावर आपल्या लक्षात येते.
 |
| मैत्रेय बुद्धांची सातव्या शतकातील मूर्ती |
 |
| अखंड दगडातील भव्य मूर्ती |
 |
| मूर्तीकडे जाणाऱ्या रस्तावरील काही फुलं |
पुढे पाणीखेर या गावात खूप सुंदर लॅण्डस्केप्स आहेत.
मध्येच एक धबधबा (ओढा सदृश ) लागला ,मग काय बऱ्याच दिवसांपासूनची स्लो शटरस्पिड शॉट घायची इच्छा पुर्ण करून घेतली. जवळजवळ ४० एक फोटो काढले. नाही जमलं तर पुन्हा, कधी सेटिंग बदल असं करता करता हलकी रिमझिम सुरु झाली . पण छत्री वापरून का होईना मी तिथे बराच वेळ फोटो काढत घालवला.
रस्त्याने दगडांवर उगवलेली लाल रंगाची फुलं लक्ष वेधून घेत होती.
मध्येच पठार लागलं . शेकडो मेंढ्या चरत होत्या .
मस्त वाटलं बघायला . येणार प्रत्येक वळण नवनवीन सरप्राइसेस घेऊन येत होतं . अमितचं पुढे बसून ट्रायपॉड लावून फोटो काढणं चाललं होतं .
गाव लागायच्या आधी थोडा चिखलाचा रस्ता आला . गावात आता पारंपारिक घर बांधणी न करता दगड व सिमेंट ने बांधलेली घरं दिसायला लागली. काचेच्या खिडक्यांच्या वापरामुळे हि घरं छानच वाटतात बघायला .
पुढे गावातील जुनी घरं ,शासनाची शाळा दिसली .
सफेद रानफुलांचे ताटवे दिसले. बर्फाचे डोंगर,दगड व बर्फाचे कॉम्बिनेशन असलेले डोंगर व त्यानंतर दिसलं कुन ग्लॅशियर .
 |
| कून ग्लॅशियर (काळसर बर्फ दिसतंय ते) |
 |
| कुंद वातावरण |
 |
| ग्लॅशियर जवळुन (झुम करून:)) |
त्याआधी बराच आधी नून ग्लॅशियर दिसतो पण ढगांमुळे तो आम्हाला दिसला नाही नपेक्षा ड्रायव्हरने तो आम्हाला दाखवलाच नाही. पुढे एके ठिकाणी थांबून आम्ही अर्ध्या गोठलेल्या व अर्ध्या खळाळत वाहणाऱ्या नदीचे फोटो काढले. तिच्या आजूबाजूला डोंगरवरुन येऊन तिला मिसळणारे,काही मध्येच गोठलेले धबधबे पाहायला मिळाले. गोठलेल्या धबधब्यांच्या खालून पाण्याच छोटा प्रवाह नदीत मिसळत होता .
 |
| बर्फाच्या खालून अजूनही वाहत नदीला मिळणारं पाणी |
रस्त्याची स्थिती मात्र खालावली होती. मधेच लागणारे ओढे ,त्यामुळे पडलेले खड्डे,दगडगोट्यांचे रस्ते सांभाळुन पार करीत आम्ही पुढे निघालो होतो.
जस रंगदुम जवळ यायला लागलं तसा एक मोठ्ठा लांबलचक रस्ता लागला , ज्याचा शेवट बर्फाळलेल्या धुक्यात हरवलेला. खरंच वर्णन करु न शकण्यासारखं दृश्य होतं ते!!
आम्ही उतरून फोटो काढले .जागाच अशी होती कि दर दोन मिनिटांनी उतरावे व व आनंद घ्यावा , फोटो काढावेत ,थांबूनच रहावं असं वाटायचं . अमित व मी आवर्जून उतरायचो. वैभव व मंदार बहुतेक वेळा गाडीतच बसून आस्वाद घ्यायचे . या रस्त्यावर आम्हाला जंगली घोडे (WILD HORSES ) दिसले . आयाळ असलेले देखणे घोडे ,त्यांची पिल्लं खूप मजा आली बघताना. यापूर्वी एवढ्या जवळून घोडयाना पाहिलं नव्हतं त्यांच्या नैसर्गिक अधिवासात फिरताना.
खाली दूरवर नदीकिनारी शेकडो मेंढ्या चरताना दिसत होत्या.
पिवळ्या रानफुलांचे गालिचेच गालिचे जिकडेतिकडे दिसत होते. त्या रानफुलांच्या गालिचाच सौंदर्य अनुभवायलाच हवं . इथे काही छान फोटो काढता आले. खळाळणारा ओढा,पिवळ्या रानफुलांची चादर,घोडे ,बर्फाचे डोंगर -स्वप्नवत दृश्य होतं -व्वा !!व्वा !!!
आणि मग आम्हाला दिसला ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो....
मॉरमॉट (mormot ) . बर्फाळ प्रदेशात आढळणारा हा लाजाळू प्राणी जमिनीत खड्डा/बीळ करून राहतो . माणसांची चाहूल लागली कि पटकन दिसेनासा होतो . साधारण पूर्ण हिवाळा ते जमिनीखाली काढतात . झाडं , फुलं ,रानफ़ळ खाऊन राहतात . इथे ते हजारोंच्या आहेत .
 |
| मॉरमॉट |
 |
| PC :राजेश |
नंतर नंतर आम्हाला खूप मॉरमॉट दिसले. दूरवर दोन पायांवर उभे असलेले ,काही काही पिल्लांसमवेत तर काही जोडीने. इथेच black redstart ,citrine wagtail हे पक्षीपण दिसले (नाव नंतर शोधलीयेत :)) .
वेगवेगळ्या प्रकाराचे ,पोताचे ,मातीचे,रंगाचे डोंगर म्हणजे निसर्गाने ह्या प्रदेशावर मुक्तहस्ते केलेली उधळण आहे असे मला वाटते. सोबतीला आता निळंभोर आकाश व ढगांचे पांढरे पुंजके असं दृश्य दिसायला सुरुवात झाली.
रंगदुम जस जवळ आलं तशी हिरवळ कमी झाली ,काही वेळातच आम्ही नदीमधून (ड्रायव्हरने काढलेला शॉर्टकट ) रस्ता पार करून रंगदुम गावात येऊन पोहोचलो.










तसं गाव म्हणणं कठीणच आहे ह्याला. उणीपुरी काही मोजकीच घर. त्यात इथे राहायला दोन तीनच च जागा एवढं हे ठिकाण लहान आहे. एक जागा म्हणजे जम्मू आणि काश्मीर टुरिस्ट गेस्ट हाऊस जेथे छोटेखानी हॉटेल पण आहे ( मेन्यू मात्र मोजकाच ,त्यांच्याकडे असेल ती भाजी व भात , कारण त्यांचा शिधा कारगीलवरून येतो,दुसरा काहीही पर्याय नाहीये त्यांना) व दुसरी जागा म्हणजे एक घर आहे. त्याचे मालक असलेले जोडपे ज्यात ना त्या बाईला ना त्या घरमालकाला हिंदी येत होतं ना इंग्रजी(एवढी परिस्तिथी कि सुरुवातीला तिने आम्हाला जागा नाही म्हणून सांगितले ,सगळ्या रूम्स खाली असताना पण ). मोडक्यातोडक्या भाषेत व हातवारे करून आम्ही तिथे एका रूममध्ये राहायची सोय केली . मस्त भिंतीला लागून लावलेल्या लांबलचक गाद्या ,काचेच्या खिडक्या ज्यामधून समोर बर्फाचे डोंगर दिसतायत ,खोलीमध्ये भरपूर चादरी,कांबळी वगैरे . एकुणात आमची मस्त सोय झाली होती. बाहेर मरणाची थंडी असली तरी रूमवर गाडी व जाड्या चादरी यामुळे राहणे जरातरी सुसह्य होते. खिडक्यांच्या काचा गार पडलेल्या. इथे त्रास म्हणजे लडाखी टॉयलेट ...तो मात्र कठीण प्रकार होता. रूममध्ये सामान ठेवल्यावर थंडी बघून कुणीच बाहेर यायला तयार नव्हते. मग मी व अमित दोघे बाहेर फिरायला व फोटो काढायला निघालो.




नंतर मंदार पण आला .पण थोड्या वेळातच थंडी सहन होईना. नागसेनने दिलेले जाडजूड जॅकेट ,थर्मल्स , कानटोपी , हँडग्लोव्ह्स असा जामानिजा असताना पण थंडीने बेजार होऊन आम्ही रूमवर परत आलो. पण मजा आली.काही छान फोटो काढता आले. थंडी काय असते हे इथे अनुभवायला मिळाले. इथे भेटलेल्या एका मेजरने आम्हाला सांगितलं कि जरी द्रास जगातील दुसरं थंड तापमान नोंदवलं गेलेलं ठिकाण असलं असं सांगण्यात आलं तरी रंगदुम ला त्याहीपेक्षा तापमान कमी होतं . थंडीमध्ये इथले लोक शहरात निघून जातात ,फारच मोजके लोक इथे राहतात.
आजच्या दिवशीच ड्र्याग दृन्ग ( DRANG DUNG GLACIER ) करायचा विचार आम्ही सोडून दिला कारण परत येता येता रात्र झाली असती व रस्ता खराब होता. नंतर त्या रूममध्ये असलेल्या एकमेव इलेक्ट्रिक पॉइंटवर अमित व राजेशने कलाकारी करून चार मोबाईल व कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या चार्जिंगला लावल्या. एकंदरीत गप्पा मस्त रंगल्या. पूर्ण संध्याकाळ आमच्या हातात होती,करण्यासारखे काहीही नव्हते . शाली,ब्लॅंकेट लपेटून रात्रीचं जेवण येईपर्यंत मारलेल्या गप्पा नक्कीच प्रत्येकाच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील.





इथे नेटवर्क नव्हते. इथे कुठलच नेटवर्क लागत नाही. जगाशी संपर्क संपतो. इथे एकच फोन आहे तोही स्याटेलाईट दूरवर असलेल्या रंगदुम मोनेस्टरीमध्ये. त्यामुळे घरी फ़ोन करायचा प्रश्नच नव्हता. सुख म्हणजे तरी काय असतं .फिरायला येताना हवा असलेला स्वच्छंदीपणा ,एकांत सगळं इकडे अनुभवायला मिळत होतं . बर्फाच्या डोंगराकडे काचेतून एकटक बघत मी माझ्या गादीवर बराच वेळ पडून होतो. कितीही डोळ्यात साठवायचा प्रयत्न केला तरी समाधान होत नव्हतं . असं माझं अनेकदा होतं . हवं असलेलं समोर आलं ,ती गोष्ट मिळाली कि सगळं संपत ,अप्रूप नाही,आता नाविन्य नाही ... काही नाही ,मनात काही भावनाच नाही..असो मग यथावकाश रात्रीची जेवणं झाली . गारठ्याच्या अमलाखाली --झोपपण लगेच लागली.
---------------------------------------------------************----------------------------------------------------
No comments:
Post a Comment