Saturday, February 4, 2017

लडाख भाग ६ - दिवस ६,७ व ८- लेह लोकल +नुब्रा व्हॅली -१५,१६,१७ जुलै

                                                १५ जुलै -लेह लोकल साईट सिइंग

           आजपासून पुढे फिरायला आमच्याबरोबर नामग्याल ड्राइव्हर होता. मोठा कलंदर.ड्रायविंग चांगली होती तशी. कधी कधी मात्र ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये चालवत असे. सकाळी लवकर उठून आम्ही मार्केट मध्ये येऊन चहा नाश्ता  करून घेतला. येथूनच काही अंतरावर एक मोटारसायकल रेंटल शॉप होते.लेहमध्ये आजकाल बाईक रेन्टवर देणारी दुकाने अमाप झाली आहेत .युनियनने ठरवलेले दर असल्यामुळे  तसा गाडीचा दर सगळीकडे सारखाच असतो,फक्त गाडी बघून घ्यावी लागते.

सौजन्य -डेव्हील व व्हील्स साईट  २०१७-१८ दर   

                              मी व राजेशने एकाच सफेद ३५०cc  ची बुलेट घेतली. दोघांनी आळीपाळीने दिवसभर चालवायची असं ठरवलं . मोठ्या गाडीच्या मागोमाग बाईक ठेवून दिवसभर प्रवास करायचा असं  ठरलं. 
                      गाडी घेतल्यावर पाहिल्यांदा  पेट्रोल पंपावर मोर्चा वळवला. लेह शहराच्या प्रवेशद्वाराजवळच पेट्रोल पम्प आहे . तिथे सुरुवातीलाच दोन्ही गाड्यांची (मोठी गाडी व आमची बाईक ) चुकामुक झाली. वैभव जाम वैतागलेला. पण त्याला कसं  समजावणार होतो कि लडाखला पूर्ण नाहीतरी एक दिवस बाईक ने फिरायचं स्वप्न पूर्ण करून घेतोय .पुन्हा कधी येऊ ना येऊ मित्रांबरोबर ,आणि फॅमिली बरोबर आलो तर बाईक विसराच. फोनाफोनी करून एकदाचे मार्गी लागलो. बुलेट जास्त स्पीड काही देत नव्हती. अगदी पुर्ण ऍक्सलरेटर देऊनसुद्धा ती दिवसभरात ६० च्या वर काही गेली नाही. 
                          पहिल्यांदा आम्ही पोहोचलो ते स्पितुक गोम्पामध्ये . लेहपासून ८ किमी अंतरावर ११व्या  शतकातील हि गोम्पा आहे. उंचावर असल्यामुळे तिच्यातील काचेच्या खिडकीतून सभोवतालचा विस्तीर्ण परिसर विलोभनीय दिसतो. मध्येच वस्ती,सुरुची दाट  झाडे ,पठार, दूरवर पसरलेले ढगाळ आकाश व क्षितिजावर डोंगर असे मस्त दृश्य दिसते इथून.




                          ह्या गोम्पामधील लाकडामधील कोरीवकाम हे उत्कृष्ट कारागिरीची नमुना आहे. बारीक व कलाकुसर असलेले नक्षीकाम



. इथे बाकी सर्व मात्र इतर गोम्पासारखेच होते.
बौद्ध लामा 

स्पीतुक गोम्पाच्या आतील दृश्य 



गोम्पाच्या आतील भाग चित्र -२ 




                             बराच वेळ घालवून मग आम्ही हॉल ऑफ फेम म्युझियम व वॉर मेमोरियल कडे निघालो. 
लेह विमानतळाच्या जवळ असलेले हे वॉर मेमोरियल भारतीय सेनेद्वारे मेन्टेन केले जाते. भारत पाक युद्धातील वीर जवानांची आठवण म्हणुन हे बांधले गेले. तळमजल्यावर विशेषतः फोटो,माहिती,स्लाईड शो , ,प्रत्यक्ष माहितीचा सेशन असं आहे. पहिल्या मजल्यावर युद्धात शत्रुसैन्याकडून हस्तगत केलेली शस्त्रास्त्रे ,बंदुका ,मशिनगन इ  काचेच्या पारदर्शक कपाटात ठेवलेल्या  आहेत .






तसेच सियाचेनमधील सैनिकांचे तंबू,पोशाख ,खाद्यपदार्थ ई  ची माहिती व डेमो देखील ठेवलेले आहेत.

सियाचेनमधील जवानांचा तंबू (मॉडेल ) 

जवानांचा सुट  

तंबुच्या आतील भागाचा अजून एक फोटो 

कॅप्शनची गरजच नाही या फोटोला 



                   तळमजल्यावर एक दुकान देखील आहे जेथे शाली ,मग्ज ,केसर इ  साहित्याची विक्री होते. इथून मी एक शाल  व केसर घेतले. बाकीच्यांनी पण काही काही खरेदी केलीच. वस्तूंची क्वालिटी छान  वाटली. आणि सैन्यातर्फे विक्री होते म्हंटल्यावर शंका घेण्याची गरजच नव्हती.एक सैनिक तळमजल्यावर ठेवलेल्या प्रोटोटाइप मॉडेल ज्याच्यावर सगळा  परिसर ,प्रत्यक्ष नियंत्रण रेषा , डोंगर,नद्या(थोडक्यात आपल्या भूभागाचा नकाशा त्रिमिती (३डी ) मध्ये ) काढलेला आहे त्याची माहिती देत होता. तेथे थांबून सगळी माहिती ऐकली. जे तिथे भेट देतील त्यांनीदेखील जरूर ऐकावी. सियाचेन व सभोवतालच्या भागांचे ते मॉडेल बघून एकंदर भौगोलिक रचनेची लगेच कल्पना येते. फारच छान  व कष्टपूर्वक बनवलेले मॉडेल आहे ते.





 पुढे स्थानिक फुले,जनावरे,यांची माहिती व फोटो असलेल्या वेगवेगळ्या खोल्या आहेत. नकाशामध्ये प्राण्यांचे अधिवास दाखवण्यात आले आहेत.













              तळमजल्यावर सगळीकडे लावण्यात आलेल्या वीरजवानांच्या फोटोखालील त्यांची वीरगाथा वाचताना डोळ्यात पाणी येते . पुरेसा वेळ काढायचा ठरवल्यास इथेच अर्धा दिवस सहज जाऊ शकतो एवढं सगळं बघण्यासारखं ,अनुभवण्यासारखं आहे. कारगिल युद्धावरचा स्लाईड शो हा न चुकवण्यासारखा आहे. प्रत्येकाने तिथे गेल्यावर वेळ माहित करून घ्यावी व जरूर बघावा.
बाहेरील मागच्या बाजूस दिसणारे दृश्य 

बाहेर ठेवण्यात आलेली तोफ 

            तिथून पुढचे ठिकाण होते लेह पॅलेस .नऊ मजल्यांच्या हा पुरातन राजवाडा म्हणजे १७व्य शतकातील राजाचे रहावयाचे ठिकाण . वरील मजले राहण्याच्या वापरासाठी होते. १९व्य शतकात इथले राहणारे लोक हा पॅलेस सोडून स्टोक पॅलेस मध्ये राहायला गेले. भग्न अवस्थेतील हा पॅलेस  आपल्या पुरातत्व खात्याने दुरुस्त केला व पर्यटकांसाठी  खुला केला.इथून झंस्कार पर्वतरांग व स्टोक कांगरी पर्वत दिसतो. आम्हाला त्यावेळी हे माहित नव्हते,त्यामुळे बघायचं राहूनच गेलं. इथे छोटंसं म्युझियम आहे. म्युझियम म्हणजे एक दोन खोल्या आहेत. त्यामध्ये अलंकार,मुकुट,समारंभातील कपडे,त्यावेळची वापरातील भांडी अशा वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच ४५० वर्ष जुनी चित्रं (जी खडे रत्ने यांच्या चुऱ्यापासून रंगवली आहेत अशी माहिती मिळाली )ती देखील बघायला मिळाली.















      एक गोष्ट मात्र खटकली कि काम होऊन पण  केलेल्या कामामध्ये सराइतपणा आढळला नाही. बऱ्याच खोल्या,रस्ते बांबू लावून किंवा तळे लावून बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. कदाचित काही कारणंही असतील त्यामागे! इथूनही सभोवतालचा विस्तीर्ण परिसर दृष्टीस पडतो.







          आता वेळ झाली होती शांती स्तुप बघण्याची. आजच्या दिवसातलं शेवटचं ठिकाण. १९९१ मध्ये बांधण्यात आलेलं हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. त्याची भव्यता,नेटकेपणा ,विस्तीर्ण परिसर,उंची हि कारणे आहेतच पण येथुन लेह शहर खूप सुंदर दिसते. रात्रीच्या वेळी  इथून दिव्यांच्या प्रकाशात दिसणारे शहर बघण्यासाठी,फोटो काढण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून येतात. हे ठिकाण जापनीज व लडाखी बुद्धिस्टांनी मिळून बांधलय. येथील भिंतीवर बुद्धांचा जन्म,राक्षसांशी लढाई ,बुद्धांचे चेहरे,निर्वाण इ शिल्पे कोरलेली आहेत. ठिकाण अतिशय स्वच्छ व शांत असं आहे. नुसतं बसून देखील वेळ घालवता येऊ शकतो. इथे एक फॉरेनर स्केच काढत बसलेली.












               इथून मग सगळे रूमवर आलो. मी व राजेश थोडे पुढे जाऊन बुलेटवर फोटोसेशन करून आलो

आम्ही घेतलेली ३५० सी सी बुलेट 


राजेश 

             सगळ्यांबरोबर रूमवर न परतता.नंतर बुलेट परत केली. जास्त काही वापरली नाही आणि म्हणावी तशी  काही फुल ऑन मजा करता नाही आली पण चलता है .  रात्री रूमवरच जेवण सांगितलेलं. प्रसिद्ध डिश थुपका खाल्ली. हे खरं म्हणजे तिबेटमधील सूप !!, पण आता बऱ्याचशा भागात खाल्लं जातं.
थुपका 



एकुणात  लेह पूर्ण फिरता  आलं नसलं (शाम व्हॅली टूर म्हणतात ह्याला) तरी बऱ्यापैकी  बघून झालं होतं .

         दिवस ७,८- लेह - खारदुंगला  पास -हंडर -लेह  -१६,१७ जुलै २०१५

    आज खारदुंगला  पास  करून हंडर  पर्यंत जायचे व तेथे राहायचे असा प्लॅन होता. लेह ते हंडरचं अंतर खारदुंगला  पास मार्गे साधारण १४० किमी आहे. नुब्रा व्हॅली लडाख व काराकोरम पर्वतरांगेच्या मध्ये आहे व दोघांना वेगळे करते. सगळी नुब्रा व्हॅली म्हणजेच एक मोठं आकर्षण होतं आम्हा सगळ्यांसाठी पण लगेच येणार मोठं आकर्षण म्हंणजे "खारदुंगला  पास". १८३८० फूट उंचीवरील जगातील सगळ्यात उंचीवरचा मोटरेबल रोड ( highest motarable road in the world)असं ह्याच वर्णन केलं जातं व तसे बोर्ड पण लावलॆले दिसतात. (प्रत्यक्षात जगातील सगळ्यात उंच मोटरेबल रोड हा बोलिव्हिया मध्ये आहे(१८९५३ फूट) व त्याखालोखाल आपल्या उत्तराखंडमधील डुंगरीला रोड लागतो(१८४०६) व खारडुंगलाचा क्रमांक ९वा लागतो व प्रत्यक्ष त्याची उंची १७५८२फूट किंवा ५३५९ मीटर आहे असं वाचनात आलय ).               
               सकाळी निघाल्यावर बर्फाच्छादित डोंगरांमधून रस्ता सुरु झाला. रस्त्याची अवस्था बिकट म्हणावी अशीच होती. मागे बसलेला माणूस अक्षरशः जवळजवळ डोलतच होता व गाडी पण खड्ड्यांमधून हेलकावे घेत रस्ते काढत चालली होती.









                        ४० किमी वर  खारदुंगला आला. बऱ्यापैकी गर्दी होती . खारदुंगला पासच्या बोर्डाबरोबर फोटो काढायला लोकांची खूप गर्दी जमली होती. आपला नंबर यायला लोकं  वाट बघत होते एवढी :) .इथे २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू नये असा बोर्ड लावलेला आहे कारण जास्त थांबले तर उंची व विरळ तापमान यांमुळे  त्रास सुरु होतो. तो होऊ नये म्हणून ती चेतावणी. सगळ्यांनाच त्रास होतो असे नाही पण आम्ही मात्र त्या नियमाचे पालन करायचे ठरवले होते. आम्ही सगळे रिलॅक्स होतो.कुणालाच कसलाही त्रास जाणवत नव्हता. त्या वातावरणात वेळ कसा गेला ते कळलंच नाही.आम्ही जवळजवळ ३०एक मिनिटं  थांबलो असू तिकडे .










पुर्ण गोलाकार इंद्रधनुष्य पाहिल्यान्दा पाहिलं


अक्चुअल टॉप 




काही वेळासाठी बंद केला गेलेला रस्ता 
तिथेच आर्मीचा एक ट्रक धूर ओकत उभा होता. प्रचंड धूर सोडत होता. कुठे जायचा नव्हता ना निघाला होता. शेवटी ना राहवून मी त्याच्यावरच्या जवानाला विचारलं एवढं प्रदूषण होतंय तर का बंद करत नाही? तर उत्तर मिळालं काहीतरी बिघाड आहे व बंद केला तर परत चालू होणार नाही म्हणून चालूच ठेवलाय. पर्यावरणाची वाट दुसरं काही नाही असं वाटलं . इथे कधी कधी हिमप्रपात होतात .व सगळीकडे बर्फ पसरतं असं तो जवान  म्हणाला.इथून निघाल्यावर गाडी कडेला लावून आम्ही बर्फात घुसलो.फोटो काढले. बर्फाचे गोळे बनवून उडवण्याचे काम झाले.








इथून वरून हिमप्रपात होऊन बर्फ खाली येते

थंडी एवढी होती कि बर्फात हात घालून खेळणं जीवावर आल्यासारखं झालेलं माझ्या! 
                लेह -२४किमी ----साऊथ पुल्लू  ---खारदुंगला --- १५कि--नॉर्थ पुल्लू 


   नाश्ता आम्ही मागेच साऊथ पुल्लू ला केलेला.तेथे आम्ही मोमोज खाल्ले. आता मुंबईत व इतर ठिकाणी मुबलक मिळत असले व खूप दुकानं उभी राहिली असली तरी तिथले मोमोज खाण्यामध्ये वेगळी मजा असते अन ती आलीदेखील. जिकडचा पदार्थ तिकडे जाऊन खाल्ला तर त्याची लज्जत वेगळीच लागते.
        नंतर एका नदीवर एका ठिकाणी काही लोकं थांबलेले दिसले म्हणुन  थांबलो. खळाळत वाहणाऱ्या नदीवर काही वेळ थांबून फोटो काढून मग पुढे निघालो.



मंदार 


  आता पुढे आम्हाला खालसर  व नंतर पुढे लागलं दिस्किट (DISKIT). नुब्रा व्हॅली मधील सगळ्यात जुनी (१४व्य शतकातील ) व मोठी गोम्पा(दिस्कीट  मोनेस्टरी) येथे आहे.वेळ होता म्हणून मग ती बघूनच पुढे जायचं ठरवलं. इथे ३२ मीटर (१०६ फूट) उंच मैत्रेय बुद्धमूर्ती आहे. अतिशय देखणी अशी हि मूर्ती तिच्या उंचीमुळे कितीही लांबून पाहिली तरी दृष्टीस पडते. उत्तम कलाकृतीचा नमुना असलेली हि मूर्ती नक्कीच बघण्यासारखी आहे. गोम्पा इतर गोम्पासारखीच वाटली.




मोनेस्टरीमधील काही रूम्सना असणारी टाळी चावी 









                            इथे फेब्रुवारी महिन्यात "festival of scapegoat"होतो. गोम्पामधून डिस्किट  गाव दिसते व लांबवर पसरलेले श्योक नदीचे पात्र दिसते. 
            गोम्पामधून निघून लवकरच आम्ही हंडरला पोहोचलो. सुरुवातीलाच खूप साऱ्या हॉटेल्सच्या दिशादर्शक पाट्या लावलेल्या दिसल्या. तिथेच थोडीशी घासाघीस करून आम्ही आमची रात्रीची राहायची जागा ठरवली.जेवण बनवायला सांगितले व तयारी करून तडक फिरायला निघालो. कारण आजचीच संध्याकाळ आमच्या हातात होती. हंडर व डिस्किट च्या मध्ये बरेचशे सॅण्ड डून्स पसरलेले आहेत व हेच नुब्रा व्हॅलीचं मुख्य आकर्षण आहे. आता काय वाळूच्या वाळवंटाचीच कमी होती व इथले सॅण्ड डून्स ती नक्कीच पूर्ण करतात . हा सगळं प्रदेश व विस्तीर्ण भाग वालुकामय आहे. शुभ्र वाळु व वाहणारा वारा  ह्यामुळे छोटे वाळवंटच जणू  असा भास होतो . वाळू दिसायला लागल्यावर आम्ही ओढल्यासारखे तिकडे चालायला लागलो.






sand  डून्स 

 आजुबाजुचे डोंगर 

 इथे डबल हम्पड बॅक्टेरियन उंट आढळतात. त्याच्यावर सफारी देखील करता येते. परत कधी बघायला भेटतील ना भेटतील त्यामुळे मी व मंदारने एक फेरफटका मारायचाच असं ठरवलं. बाकी कुणी इंटरेस्ट दाखवला नाही व चक्क नकारच दिला. मग ४०० रुपयात त्याने त्या उंटावरून ठरवलेल्या ठिकाणावरून एक राऊंड मारून आणला. बघायला बरं  दिसलं तरी उंटावरून बसून रपेट मारणं म्हणजे एक दिव्यच वाटलं, फारच अनकंफर्टेबल वाटलं. असो अनुभव तर घेतला.










                               आम्ही रपेट मारून येईपर्यंत बाकीचा ग्रुप वाळूवर पडून सभोवतालची मजा घेत होता :) विशेषतः वैभव :)



तिथेच एका तंबूमध्ये कल्चरल प्रोग्रॅम होता. तिकीट काढून आत गेलो. लडाखी पारंपरिक वेशात सुंदर नटलेल्या स्त्रियांनी तीन वेगवेगळी  नृत्य सादर केली .चेहऱ्यावरचे  भाव मात्र निर्विकार होते. कदाचित दररोज तेच असल्यामुळे त्या तशा वागत असतील. पण एकंदरीत नृत्य ,हावभाव,त्यांचे कपडे,दागिने,टोप्या ,पायातली वाहणे सगळंच एकदातरी अनुभवावं असं होतं .









                            त्याच्या आधी धनुष्य बाण  वाला बसलेला . तिथे देखील मी एकट्याने माझी हौस फिटवून घेतली. बाकी कुणी का कोण जाणे इंटरेस्टेड दिसलं नाही त्यातदेखील. तिथून निघून आम्ही काळोख पडायच्या आत रूमवर येऊन पोहोचलो.रुम मस्त होती. समोरच अजस्त्र डोंगर दिसत होता. कालच्या रात्री केलेली ऍस्ट्रोफोटोग्राफी(:))☺ अयशस्वी ठरली होती. आज मात्र काही केलं तरी आकाशगंगेचा फोटो काढायचाच असं मनाशी ठरवलं होतं .नशिबाने वातावरण पण चांगले होते. नुसत्या डोळ्यांनी सुद्धा आकाशगंगा पुसटशी दिसत होती. मग जेवण झाल्यावर अमितबरोबर पुढचे एक दोन तास मनसोक्त नाईट फोटोग्राफी केली. राजेश थोडा वेळ होता मग निघून गेला. वेगवेगळ्या सेटिंग्सवर लॉन्ग एक्सपोजर शॉट्स काढुन  काढून दमलो. पण मनासारखे फोटो काढायला मिळाल्यामुळे व ते थोडे मनासारखे आल्यामुळे थंडीमध्ये बाहेर राहून मेहनत केल्याचे चीज झाले.त्याच आनंदात येऊन झोपलो.


उशिराने कळतंय कि माहोल  तर होता मीच कमी पडलो नीट फोटो काढायला 



अजून एक अयशस्वी प्रयत्न (तेव्हा चांगला वाटलेला :))

        दुसऱ्या दिवशी सकाळी आरामात उठून नाश्ता वगैरे करून पार्टीच्या प्रवासाला लागलो. (सकाळीच नामग्याल गायब होता ,उशिराने परत आल्यावर नदीवर आंघोळ  करायला गेलेलो असं कारण दिल )असो. पुन्हा एकदा खारदुंगलाला थांबलो .तिथल्या हॉटेलात कॉफी घेतली. पुन्हा फुरसत मध्ये फिरून घेतलं . फोटो काढले,काढून घेतले. रस्त्यामध्ये थांबत थांबत लेहला पोहोचलो. संध्याकाळ आराम करण्यात घालवली,त्याआधी सवय लागल्याप्रमाणे मार्केटमध्ये एक फेरफटका मारून आलो. मार्केट मध्ये फिरणं रिफ्रेशिंग अनुभव असतो. का ते तिथं फिरल्याशिवाय समजणार नाही.









____________________________________********___________________________________ 

























































No comments: