Saturday, February 25, 2017

लडाख भाग ८ - शेवट - दिवस १२ ते १५ -२१ ते २४ जुलै

                        आज व उद्या आमचा त्सो मोरिरी  लेक व परत असा प्लॅन होता पण लेहमध्ये अचानक २१ तारखेला संप पुकारण्यात आला. बाहेरून येणाऱ्या   गाड्यांमुळे, ड्राइव्हरमुळे येथील लोकल लोकांच्या पोटावर पाय येतो हा विषय !त्यामुळे दिवसभर कुठलीही बाहेरची गाडी लेहमध्ये येऊ देणार नाही अशी अनाउन्समेंट आदल्या दिवशीपासून चालू होती.
             
टेन्शनमध्ये आलेले मित्र 


त्यातच अजून एक बातमी आली  कि श्रीनगर लेह व लेह-मनाली दोन्ही रस्ते भुसखलनामुळे (landslide ) बंद झाले आहेत अनिश्चित काळाकरिता. त्यामुळे  ग्रुपमधील मेम्बर्स पॅनिक झाले. व आजच्या दिवशी बाहेर न पडायचा निर्णय सगळ्यांनी घेतला. आपण सकाळी लवकर निघून जाऊ स्ट्राईक सुरु व्हायच्या आधी ,दुसऱ्या दिवशी येईपर्यंत सगळं थंड झालेलं असेल,आल्यानंतर बघू कसं जायचं ते हा माझा सल्ला कुणीच ऐकला  नाही. ग्रुपमध्ये एकत्र असल्यामुळे मी एकट्याचे मत लादू  शकत नव्हतो  ना कि एकटाच जाऊ शकत होतो. माझा फारच भ्रमनिरास  झाला. हातातोंडाशी आलेला घास कुणीतरी हिरावून घेतं  तसं  फीलिंग आलं .जाम उदास वाटलं त्यादिवशी. आज हे लिहीतानादेखील वाटतं  त्यादिवशी निघालो असतो तर नक्कीच त्सो मोरिरी तरी बघता आला असता.  तो पुर्ण दिवस रूमवर बसून घालवला. रात्री जेवून झोपून गेलो.

                                                                  २२/७/२०१७

                           पूर्ण दिवस पत्ते  खेळण्यात ,गप्पा मारण्यात ,मार्केटमध्ये फेरी मारून व रस्ते कधी उघडतात याची वाट बघण्यात गेला. जर काल  सकाळी आम्ही निघालो असतो तर आज संध्याकाळपर्यंत परत आलो असतो पण आता काही पर्याय नव्हता. वेट अँड वॉच करण्याशिवाय आमच्या हातात काहीच नव्हतं .लेह मध्ये इतर वेळेला राहणं मस्तच वाटलं असतं पण आता कुठे जायचं नव्हतं ,घरची ओढ लागलेली ,लेहवरून जाणारे दोन्ही रस्ते अनिश्चित काळाकरिता बंद होते अशा परिस्थितीत लेहमध्ये राहणं अडकल्यासारखं वाटायला लागलेलं

                                                                          २३ /७/१७
 सकाळपासून आम्ही आमच्या बॅग्स पॅक करून रस्ते सुरु व्हायची वाट बघत थांबलो होतो. लेह मधून विमानाची तिकीट २६००० वर पोहोचल्यामुळे तो पर्याय बादच झाला होता. आम्ही काही ड्राइव्हर च्या संपर्कात होतो तसेवांगकरवी . रस्ता उघडला कि आम्हाला फोनवरून कळणार होत.आम्ही ज्या गेस्ट हाऊसमध्ये राहत होतो ती लेडी फारच प्रेमळ व समंजस होती. आमच्यासाठी लेह टॅक्सी स्टॅंडपर्यंत जाऊन बिचारी माहिती काढून आली. दोन रूम्स अनावश्यक म्हणून आम्ही एका रूममध्ये राहायचा निर्णय घेतला तेव्हा देखील मी चार्ज नाही करणार तुम्ही रहा त्या रूममध्ये असच म्हणाली . खरंच माणुसकी असलेली माणसं होती त्या कुटुंबातील. स्वच्छ ,नीटनेटकं,टापटीप असं ते गेस्ट हाऊस ह्या लोकांच्या आदरातिथ्यामुळे आम्ही कधीच विसरू शकत नाही.
        शेवटी ७ च्या दरम्यान बातमी आली कि श्रीनगर लेह रस्ता वाहतुकीसाठी खुला केलाय . मनाली -लेह रस्ता अजून बंदच होता. दुसरा पर्याय नव्हताच आमच्याकडे. मनाली-लेह रस्ता राहून गेला. मी सगळ्यात जास्त अपसेट झालो. वर्षानुवर्षे वाट बघून शेवटी नाईलाजाने मला चंदीगडमार्गे न जाता  पुन्हा कार्गिलमार्गे जावं लागत होतं . गेस्ट हाऊस च्या सगळ्या कुटुंबाबरोबर फोटो काढून आम्ही निघालो. सर्वानुमते रात्रीचा प्रवास करायचा असं ठरलं कारण आता वेळ घालवला व रस्ता पुन्हा बंद झाला तर आमची काही खैर नव्हती.प्रवासखर्च वाढला असता,सुट्ट्या संपत आल्या होत्या. रात्री ३ च्या सुमारास कारगिलपर्यंत  पोहोचलो तिथे गाडी  बदलली  व सकाळी ९ ३० च्या दरम्यान एकदाचे श्रीनगरला पोहोचलो. गाडीमधूनच अमितच्या बहिणीला फोन करून मुंबईची विमानाची तिकिटं काढून घेतली. श्रीनगरला आल्यावर पुन्हा टॅक्सी करून विमानतळावर पोहोंचलो. खूप साऱ्या पाण्याच्या बाटल्या,खायचं सामान उरल होतं ते तिथेच टाकलं व परतीच्या  विमानात बसलो.
                महिनोनमहिने वाट बघून प्लॅन केलेली लडाख ट्रिप संपली. सगळं मनासारखं नाही झालं तरी जे केलं ते कमी नव्हतं.७५ % तरी करता आलं . निसर्गसौंदर्याचे वैविध्य आम्ही ह्या प्रवासात पुरेपूर अनुभवले. मनसोक्त मजा केली. मनासारखे हिंडलो ,खूप फोटो काढले ,स्वछंदी जगलो. पुन्हा ह्या स्वर्गात यावंच लागेल परत. एकटं ,फॅमिलीबरोबर ,मित्रांबरोबर किंवा कसंही !! हा स्वर्ग नाही बघितला तर काय बघितलं?? पुन्हा कधीतरी गेलो स्पिटी व्हॅली किंवा लडाखला तर भेटूच पुन्हा ब्लॉगच्या माध्यमातुन !!!!


                                                             समाप्त 

ब्लॉग म्हणा किंवा फोटो लॉग ह्या माध्यमातून लडाख नवीन माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. लिखाणाबद्दल माहित नाही पण फोटो नक्कीच  तेथील सृष्टी सौंदर्य सांगायला. आशा आहे लिखाण आवडेल व लडाख फेरी घडेल त्यामुळे. लिखाणातील काही चुका असल्यास क्षमस्व . असो!! देर आये दुरुस्त आये ह्या उक्तीप्रमाणे उशिरा का होईना ब्लॉग पोस्ट करतोय. 






       

No comments: