Wednesday, February 8, 2017

लडाख भाग ७ - दिवस ९,१० व ११- लेह ते पॅंगॉन्ग सरोवर व शाम व्हॅली - १८,१९,२० जुलै

                               लेह -पॅंगॉन्ग (१७१ किमी) - लेह -शाम व्हॅली 

          लडाखला लोक ज्या मुख्य कारणासाठी जातात त्यापैकी एक म्हणजे पॅंगॉन्ग सरोवर. इथल्या पाण्याच्या वेगवेगळ्या निळ्या छटा खूपच छान  दिसतात. पाणी खरोखरच निळं दिसतं हे इथे आल्यावर समजतं . बोडके काहीसे बर्फाच्छादित डोंगर,दूरवर पसरलेले निळेशार पाणी म्हणजे एक अजब सृष्टीसौंदर्य आहे. ६०% चीनमध्ये व ४०% भारतात असलेले हे सरोवर १३४ किमी पसरलेले आहे.
       भारत व चीनची एल.ओ.सी.  ह्या लेकमधून जाते व पूर्वीपासून हा वादग्रस्त भागच राहिलेला आहे. पॅंगॉन्ग नो डाउट ह्या टूरमधील माझ्यासाठी सगळ्यात मोठं आकर्षण होतं . त्यामुळे एकाच दिवसात खूपच हेक्टिक करून आम्हाला किंवा मलातरी परत यायचच नव्हतं.सकाळी लवकर सुरु केलं व स्पॅगमिक पर्यंत भोज्जा करून परत आलं तर करता येत हे ठिकाण एका दिवसात पण प्रवासाची दगदग खूपच होते आणि त्याहीपेक्षा नुसतं बघण्यासारखं ठिकाण नाहीये हे,अनुभवण्यासारख आहे.त्यामुळे आम्ही दोन दिवस प्लॅन केलेलें . लेहमधूनच तसेवांग च्या ओळखीने एक होमस्टे बुक करून ठेवलेला कारण लेकशेजारी टेन्ट आहेत पण बऱ्यापैकी महाग आहेत. त्यामुळे अगोदरच रहायची सोय करून ठेवली. आता त्यामुळे माझा मन गावात राहायचा प्लॅन फिस्कटला. कारण नंतर सोय नाही झाली तर काय करा ह्या भीतीने आम्ही स्पॅगमिकमध्येच रूम बुक करून ठेवली(  म्हणजे होमस्टे होता).

 प्रवासाचा मार्ग:
  लेह - शे पॅलेस -कारू (३६किमी) - सक्ती (१०किमी)-चांग-ला(  ३२किमी)-डुर्बुक - टांगत्से -लुकांग -स्पॅगमिक -पॅंगॉन्ग -मन गाव

नुब्रा व्हॅली मधून देखील दोन रस्ते पॅंगॉन्गला जातात व ज्यांच्याकडे वेळ कमी असतो ते लोक (१.वारी-ला मार्गे २. श्योक व्हिलेज मार्गे)हे रस्ते प्रीफर करून नुब्रा व्हॅलीतून पॅंगॉन्गला परस्पर जातात .आमच्याकडे वेळ होता त्यामुळे आम्ही पुन्हा लेह ला येऊन पॅंगॉन्ग लेह टू  लेह करायचं असच ठरवलेलं. पूर्वी पॅंगॉन्गसाठी परमिट लागायचं पण २०१४ सालापासून भारतीय नागरिकांसाठी परमिट रद्द करण्यात अली त्यामुळे आमच्यासाठी परमिंटचा प्रश्नच नव्हता.
       सकाळीच लेह वरून निघाल्यावर शे पॅलेसला न थांबता आम्ही सरळ निघालो. रस्ता खारडुंगला एवढा वाईट नव्हता. खूप वळणावळणाचे डांबरी रस्ते व बर्फाच्छादित डोंगर व एका बाजूला दरी असा रस्ता चालू झाला. अधे मध्ये बी.आर.ओ. (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ) च काम चालू होतं .प्रचंड धूर ओकणारे JCB बऱ्याच वेळा नजरेस पडले. यांची गरज तर आहे पण प्रदूषण कमी करण्यासाठी काही करू शकत नाही का असं प्रकर्षाने वाटलं.
 














 नंतर आलो चांग-ला ह्या माउंटेन पासवर . १७५९० फूट ,५३६० मीटर  उंचीवरील हा पास जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोटरेबल पास आहे असं म्हंटल जात (हे खर नाहीये हे आपण मागेच वाचलंय). पोहोचण्यापूर्वी बराच चढाचा रस्ता आहे.चांग-ला चा अर्थ (चांग -साऊथ ,ला-पास )म्हणजेच पास टुवर्डस साऊथ असा होतो. इथे असं मानलं जातं कि चांगला बाबा नावाच्या साधूच्या नावाने हा पास आहे व तोच इथल्या सर्वांचं रक्षण करतो . इथे चांगला बाबाच मंदिर सुद्धा आहे. नवीन सर्व्हेनुसार हा जगातील नवव्या क्रमांकाचा मोटरेबल पास आहे  (खारडुंगला चक्क दहावा लागतो)



चांगला बाबा मंदिर 



इथे येताना आम्ही कॉफी प्यायलो..मस्त कॅफे होता -साभार राजेश 

साभार राजेश 

साभार राजेश 


       तिथून  बोडके डोंगर , मध्येच चालू असलेले रस्त्याचे काम तर कधी गवताळ भागात चरणारे जंगली घोडे दिसले. घोडे मस्त आयाळ असलेले असतात ,वेगळेच दिसतात. तिथून पुढे गेल्यावर मच हाईप्ड पॅंगॉन्गचा फस्ट लुक दिसला .

चालत्या गाडीतून घेतल्यामुळे थोडा ब्लर आलाय 


साभार राजेश 


साभार राजेश 

साभार राजेश 


स्पॅगमिक गावाजवळ येताना 

सावल्यांचा  खेळ 


पॅंगॉन्ग चा पहिला लुक 


 तिथे  आम्ही काही थांबलो नाही . खरंच पुढे सगळं पॅंगॉन्ग वाट बघत असताना इथे का  घालवायचा?स्पॅगमिक गावापासून हे सरोवर सुरु होतं . पुढे ९ किमी वर 'मन' गाव व त्याच्याही अजून पुढे 'मिरक' गाव लागतं . खूप आग्रह करुणपण मित्र मिरकमध्ये राहायला तयार झाले  नाहीत. नामग्याल (ड्राइव्हर) पण आढेवेढे घेत होताच. कारण पुढे रस्ता थोडा खराब आहे ,वस्ती विरळ व कष्ट जास्त!! आता त्यातल्यात्यात मन पर्यंत जायचंच असा हट्ट करून  सगळ्यांना तयार केलं . पुढे ऐनवेळी राहायला जागा नाही मिळाली तर?असा सगळ्यांचा प्रश्न होता व त्यावेळी तरी माझ्याकडे त्यासाठी उत्तर नव्हतं :(. पण पॅंगॉन्गचं खूप सुंदर दर्शन तिथून घडत व गर्दीपण कमी असते त्यामुळे  राहायची इच्छा होती.
          स्पॅगमिक ला थांबून नाश्ता केला. इथे बरेच ढाबे आहेत. थ्री इडियट्स नावाने वगैरे पण आहेत चक्क! खाऊन झाल्यावर वेळ न घालवता सरळ मोर्चा वळवला तो लेककडे.थ्री इडियट्स चित्रपटातील क्लायमॅक्समुळे प्रसिद्ध झालेल्या पॉइंटवर गेलो. तिथे लेकचे ,ब्राऊन हेडेड गल्सचे व निळ्या लेकमागील डोंगररांगांचे उदंड फोटो काढले. पण आभाळ व पाणीदेखील त्यादिवशी इतर फोटोंमध्ये दिसतं तितकं निळं नव्हतं .आकाशात ढग जास्त असल्यामुळे भ्रमनिरास झाला खर तर !!पण लेक आहे सुंदरच.




क्रिस्टल क्लीयर पाणी 

अंडर वॉटर फोटो घेता आला असता तर?




मंदार फेमस स्पॉटवर एकटाच उभा असताना 









राजेश 

अमित 


साभार राजेश 





तिथून पुढे आम्ही मन गावापर्यंत गेलो . आम्ही काही शाळेचं साहित्य आणलं होत तेथील मुलांना द्यायला त्यामुळे गावात गेल्यावर काहीजणांना सांगून मुलांना बोलावून घेतलं व जे काही आणलं होतं ते त्या मुलामध्ये वाटून टाकलं . इथे आमच्या गाडीचे मागचे दोन्ही टायर एका ओढ्यात अडकले .गाडी जागची हलेना. थंडी वाढू लागलेली. आता गाडी निघाली नाही तर मन गावातच मुक्काम शोधायला लागेल असा विचार चमकून गेला. नामग्याल व इतर काही ड्राइव्हर ,गावकरी इत्यादी लोकांनी व आम्ही मिळून गाडी काढायचा प्रयत्न चालवलेला .मग नामग्यालने दोन जॅक दोन्ही बाजूला लावून गाडी थोडी थोडी उचलत खाली दगड ठेवत बऱ्याच प्रयत्नांनंतर बाहेर काढली. मग परत पार्टीचा प्रवास(स्पॅगमिकपर्यंत)चालू केला. रस्त्यात ठिकठिकाणी बियरच्या बाटल्या टाकलेल्या बघून चीड आली व वाईटही वाटलं.निसर्गसुंदर ठिकाणांचा अनादर व पर्यायाने व कालांतराने त्यांचा ऱ्हास हे मानवी प्रवृत्तीचे अहम  वर्तन व त्याचा परिणामच  आहे.  अख्या भारतात आपल्या जनतेची हीच विकृती दिसून येते. स्थळ काळाचं भान न ठेवता कचरा करायची प्रवृत्ती आपल्यात जास्त दिसते. अर्थात काही अपवाद वगळता !!




शालेय साहित्याचे वाटप केल्यांनतर एक ग्रुप फोटो  मुलांसमवेत 







मन गावातील ओढा ज्यात गाडीची मागची दोन्ही चाकं फसलेली 




       तळ्याशेजारी असणाऱ्या मोजक्या दोन घरांपैकी एका घरात राहायला सांगून ठेवलेलं होतं . घर जुनं असलं  तरी राहायची सोया मस्त होती. चार वेगवेगळ्या रूम्स होत्या व प्रत्येकीमध्ये ७-८ जणांना राहण्यासाठी गाद्या घातलेल्या होत्या .आम्ही घेतलेल्या रूममध्ये ३ डबलबेड रांगेत होते . मस्त आटोपशीर जागा होती. प्रश्न फक्त टॉयलेटचा होता कारण लडाखी टॉयलेट म्हणजे सुखासीनतेची सवय असलेल्या आपल्यासारख्यांसाठी एक दिव्य असते.एक खड्डा असतो फक्त उंचावर. बाकी काही नाही. पाणी पण कुठूनतरी आणायचे असला प्रकार होता.
      रूममध्ये सामान टाकून मी व अमित दोघेच लेकवर फिरायला गेलो. मनसोक्त पाहिजे तितका वेळ ,शांतपणे ,डोंगरांकडे व पाण्याकडे पाहत राहण्यात एक औरच मजा असते .पुन्हा फोटो काढून ,गप्पा मारून आम्ही रूमवर परत आलो. रात्री अनायासे अजून एक इच्छा पूर्ण होणार होती ती म्हणजे लडाखी घरात ,त्यांच्या मेजावर बसून त्यांनी  घरात शिजवलेले  अन्न खायचे.रात्री त्यांनी खूपच जेवण बनवलेलं आमच्या मानाने !आम्ही जेवलो.जेवण चांगलं होतं . पण एक प्रकारचा कुबट वास घरात भरून राहिलेला वाटला . बाकी त्यांचं राहणं जवळून बघता आलं हे नक्की. त्यांची भांडी ,ताटं ,सामान,कारपेट ,गुरगुर चहा बनवायचा बांबू,सरपण ,टेबलं  सगळं काही खासच . आजचा दिवस  मस्तच गेला.



खडी 

पॅंगॉन्ग च्या बॅकग्राउंड वर फोटो काढायचा फसलेला प्रयत्न 

लव्ह 

लक्झरी तंबु -पॅंगॉन्ग स्पॅगमिक 

कुतुहल 

निळ्या छटा 

पश्मिना जातीच्या गोटस 

पश्मिना गोटस 

           दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घराजवळ एक फेरफटका मारला. भरपुर पाळीव पश्मिना गोट  बघितल्या. हि जात खर तर तिबेटी . त्यांच्या मांसासाठी व कातडीसाठी (पश्मिना उल ह्यांच्यापासून बनवली जाते) त्या पाळल्या जातात . गावात खाऊन जगणाऱ्या ह्या बकऱ्या उणे तापमानात पण तग धरतात .
      मग परतीच्या  प्रवासात पॅंगॉन्गला डोळ्यात साठवत, वेगवेगळे पक्षी व मॉरमॉट बघत आम्ही निघालो. मध्ये पुन्हा चांग -ला पास ला थांबून वेळ घालवला.तिथून निघून मग शे पॅलेस ला थांबलो. शाली रस्त्यावर म्हणजे शे पॅलेससमोर एक छोटा तलाव आहे. प्रेयर फ्लॅग्सचं त्यात पडलेलं प्रतिबिंब फारच छान दिसत होतं . शे गावाजवळ १६५५ साली त्यावेळच्या लडाखी राजाने हा पॅलेस बांधला. पॅलेसच्या मध्येच शे मोनेस्टरी बांधली गेली आहे. वर पॅलेसला  उजवीकडे खूप सारी प्रेयर व्हील्स लागतात .मंदार बरीचशी फिरवत पुढे गेला. वरून खूप दुरवरचा प्रदेश ,हिरवागार पट्टा ,पुन्हा सुरुची झाडे,डोंगररांगा दिसत होत्या. दिवे,भिंतीवरील चित्र ,फ्रेम्स,काचेमधल्या बुद्धमूर्ती ,टुरिस्टनी ठेवलेले पैसे ,चॉकलेट्स असं कॉमन दृश्य दिसत होता आतमध्ये.तिथून मग मात्र लेह मधील होमस्टेला परत आलो.


होम स्टे च्या आतमधील एक रूम 

थोडी वेगळी अरेंजमेंट 


















शे पॅलेस 
साभार राजेश 

वैभव:)





भिंतीवरील शेकडो वर्षे जुनी चित्रं 




भव्य मुख -शे पॅलेस च्या आतमध्ये 

आमच्या रूममधून दिसणारा शांतीस्तूप -रमणीय संध्याकाळ 


संध्याकाळ रिकामीच होती त्यामुळे जवळच असलेल्या "लडाख रॉक अँड मिनरल्स म्युझियम" ला भेट द्यायला गेलो.वेगवेगळ्या प्रकारचे दगड ,फॉसिल्स ,सेमी प्रेशियस ,प्रेशियस स्टोन्स ,मिनरल्स इथे काचेच्या पेट्यात ठेवलेले आहेत ,त्यांची माहिती दिलेली आहे.       http://www.ladakhrocksminerals.com/ - हि साईट आहे व गॅलरीमध्ये जाऊन आपण त्या मुसियम मधल्या खजिन्याचा आस्वाद घेऊ शकतो. परत येऊन जेवून मस्त झोपून गेलो.






________________________________________________________________________________

                              २० जुलै २०१५ लेह बफर दिवस /आरामाचा दिवस (शाम व्हॅली केली )
 आज लेहमधला बफर दिवस होता.  म्हणजेच प्रवासामध्ये मागेपुढे झाल्यास हा दिवस अतिरिक्त म्हणुन  ठेवलेला. लडाखच्या प्रवासात अनिश्चित वातावरणामुळे व दरडी कोसळण्यामुळे रस्ते अचानक बंद होतात व मग प्रवास रद्द करावा लागतो किंवा अडकून पडावं लागतं . ते विचारात घेऊन आम्ही हा दिवस मुद्दामून ठेवला होता . आता बफर डे असला म्हणून  एवढ्या लांब येऊन रूमवर लोळत पडायचं हे काही पटेना. मार्केट व शॉपिंग काय करता येईल,आपण फिरून येऊ असं मी व राजेशने ठरवलं ,व मोर्चा वळवला पुन्हा बाईक रेंटल शॉपकडे . राजेशला इम्पल्स (हिरो ची ड्युएल स्पोर्ट्स प्रकारातील बाईक ) आवडली. ती घेतली व निघालो. आमच्याकडे ईतर कसलेच गियर नव्हते,म्हणजे जॅकेट ,शुज  किंवा नी-कॅप  वगैरे. पाऊस  पडणार नाही अंदाजावर निघालो.
                     मॅग्नेटिक हिल पॉईंट येताना बघता आला नव्हता म्हणावा तसा.  त्यामुळे तिथे पहिला थांबा घेतला. इथे डोंगरावर थोडी चढण आहे. पूर्वी बाईकस्वार हा स्टिप चढ चढुन  परत खाली यायचे . ऍडव्हेंचर वाटायचं बघून. माझी पण खुप इच्छा होती तसं  करायची पण एकतर बाईक हाताखालचीं नव्हती व तिकडे बोर्ड देखील लावलेला कि ह्या पॉईंट च्या पुढे जाऊ शकत नाही म्हणून . मग मात्र इच्छा आवरावीच लागली. ह्या जागी गाड्या आपोआप सरकतात ,न्यूट्रल वर पुढे जातात असा लोकांचा अनुभव आहे व बोलबाला पण आहे पण आम्हाला मात्र तसं काही अनुभवायला मिळालं नाही.

डोंगरावर जिथे लिहिलंय तिथून बाईकस्वार फेरी मारून येत  असत (बोर्ड पण दिसतोय चित्रात)

                    पुढे मस्त घाटाचा रास्ता लागला ,एका बाजुला खोल दरी ,नदी ,वळणावळणाचा डोंगराळ रस्ता ,थंडगार हवा ,मस्त पळणारी बाईक अजून काय पाहिजे ?? छोटासा का होईना हिमालयन राईड अनुभवत होतो आम्ही. निम्मू साधारण ३० किमी वर आहे पण पूर्ण गावात न जाता आम्ही आधीच निम्मू संगम बघण्यासाठी एक पॉईंट आहे,वॉच टॉवर बांधलाय तिकडे थांबलो. इथे इंदु  व झंस्कार ह्या नद्यांचा संगम होतो. कारगिल -लेह रस्त्यावरचा हा पॉईंट फेमस आहे. दोन वेगवेगळ्या नद्यांचे नजरेस वेगळेपण जाणवणारे प्रवाह एकत्र मिळुन पुढे जाताना बघणं म्हणजे एक अनुभवच आहे. खूप मस्त वाटतं .देवप्रयाग वगैरे बघितले असेल कुणी तर त्याला मी काय बोलतोय त्याची कल्पना येईल.प्रत्यक्ष संगमापर्यंत जायची सोय असूनदेखील आम्ही खाली नाही गेलो. आकाश काळ्या  ढगांनी भरून आलेलं .पाऊस पडायला लागला तर  थंडीत बाईक वरून परत येणं अशक्य झालं असतं किमान मलातरी ,कारण बोचरी थंडी सहन होण्यापलीकडे जाते पाऊस पडल्यावर.
         
निम्मू येथील संगम 



इथे खाली संगमावर राफ्ट दिसत होत्या . चिलिंग ते निम्मू अशी राफ्टिंग चालते व निम्मूला येऊन संपते .  वॉच टॉवरसाठी पायऱ्या आहेत. इथून उंचावरून संगम व आजूबाजूचा परिसर अप्रतिम दिसतो. एकदम वाइड अँगल . वर टॉवरचे बांधकाम पूर्ण सिमेंटचे असले तरी सोसाट्याचा वारा वाहत होता.नुसतं उभं राहून फोटो काढायचा म्हंटला तरी कॅमेरा हलेल एवढी हवा होती .  तिथे बराच  घालवून,फोटो व व्हिडिओ काढून आम्ही परतीला निघालो. मी सारखा पाऊस पडला तर काय रे ?असा राजेशकडे घोशा  लावला होता.
       परतीच्या प्रवासात येताना लागलेला "गुरुद्वारा पत्थर साहिब" हा गुरुद्वारा लागतो. १५१७ मध्ये शीख धर्मगुरू गुरुनानक यांच्या लढाख  भेटीच्या आठवणींमध्ये हा गुरुद्वारा बांधण्यात आलाय . येथील पाटीवर त्याचा रंजक इतिहास वाचायला मिळतो,तो नक्की वाचण्यासारखा आहे. गुरुद्वारा आतून खूप मस्त आहे. लंगर मध्ये चहा व स्नॅक्स होते. गुरुद्वाऱ्याच्या आतमध्ये मोठ्ठा अजस्त्र दगड आहे ज्याच्यावरून ह्याला नाव पडले तो व ज्याचा इतिहास सांगितलं जातो तो. आतील वातावरण एकदम मस्त वाटते. चुकवू नये अशी जागा आहे. डोक्यावर शीख लोकं  आत जाताना घालतात तसं भगवं कफनी घालून आम्ही आत गेलेलो. इथून तडक  लेह गाठल. इथेच जवळ जनरल झोरावर सिंग या पराक्रमी सरदाराचा झोरावर फोर्ट(ह्या सरदाराच्या पराक्रमामुळे ह्याला भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हंटले जाते ) आहे. पण डागडुजी चालू असल्यामुळे तो बंद होता. त्यामुळे आत जरी गेलो तरी या छोट्या फोर्टला  बाहेरून बघूनच आम्हाला  परत यावं लागलं.
गुरुद्वारा पत्थर साहिब आतील  दृश्य 


नक्की वाचा - पत्थर साहिब ची कथा 







रिपेरिंग चालू असताना झोरावर फोर्ट चा दरवाजा 


        इथे एका ढाब्यावर आम्ही थांबलो. इथे जेवण मस्त होते कारण आदल्या दिवशी आम्ही येथेच जेवलो होतो. अनलिमिटेड चिकन तरी दिल्यामुळे आमच्या ग्रुपला जाम आवडलेलं हे हॉटेल कम ढाबा . इथे आम्ही चहा प्यायलो. तेवढ्यात पाऊस सुरु झाला. रिमझिम असला तरी भिजवायला पुरेसा होता. एव्हाना काळोख पडायला सुरुवात होण्याची चिन्ह होती. त्यामुळे पाऊस सुरु असला तरी आम्ही गाडी परत  घेतला. कॅमेरा,मोबाइल बॅगेत पॅक करून आम्ही सुसाट लेह मेन  मार्केट गाठलं . पण पाऊस व थंडी मुळे  हालत  खरंच  खराब झाली. अक्षरशः थरथरत मी गाडी चालवत होतो. राजेश ने पकडून ठेवलेलं एवढा जास्त  होतो मी. नक्कीच अविस्मरणीय  मोमेंट्स होत्या त्या. गाडी कशीबशी दुकानात पोहोचवली व परत केली. नंतर त्याही परिस्थिती मध्ये आम्ही मार्केट फिरून खरेदी करत बसलो,नंतर हॉटेलवर परत आलो.
                एकंदरीत बफर डे  रॉकिंग गेला. संध्याकाळच्या पावसातील ती राईड मी व राजेश दोघंही कधीच विसरणार नाही.आता उद्या साठी आम्ही त्सो मोरिरी हे लेक प्लॅन केलेलं पण नशिबात काही औरच होतं  व लडाखची ट्रिप  अनपेक्षित वळण घेणार होती.....




_________________________________________________________________________________
 














.







No comments: